औरंगाबाद, दि २९ जानेवारी सध्या समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांगासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र समाज कल्याण विभागाला दिव्यांगासाठी काम करताना मर्यादा येत आहेत. या विभागाअंतर्गत दिव्यांगासाठी जे काम होत आहे ते सकारात्मक व तळागाळातील गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी सुहास तेंडुलकर यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केली. वार्तालापाच्या सुरूवातीला ज्येष्ठ छायाचित्रकार माजेद खान यांनी सुहास तेंडुलकर यांचा सत्कार केला. यावेळी दिव्यांगाच्या समस्या व उपायावर सुहास तेंडुलकर यांनी सविस्तर चर्चा केली.
पुढे बोलताना सुहास तेंडुलकर म्हणाले की, दिव्यांगाने परिस्थीचे भांडवल न करता शस्त्र बनून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. तसेच कुटुंबियांनी, समाजाने व शासनाने दिव्यांगाकडे सहानुभूतीच्या नजरेने न बघता मैत्रीचा हात देऊन त्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक व सामाजिक दृष्टया त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या आवडी जोपासण्याचे स्वातंत्र कुटुंबियांनी दिले पाहिजे. ग्रामीण भागातल्या अनेक दिव्यांगाना शिक्षणाअभावी सरकारी योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे दिव्यांगानी शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. शासनानेही त्यांच्या शिक्षणाबद्दल जनजागृती केली पाहिजे. 
मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच व महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकुण 18 जिल्ह्यांमध्ये तसेच गोवा राज्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये विविध प्रवर्गातील अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव, साधने उपलब्ध करून दिले आहेत. या अपंग व्यक्तींच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक, विकासात्मक विविध उपक्रम राबवित आहे तसेच विविध शासकीय योजना या अपंग व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. 

सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 5,500 कर्णबधिर मुलांना दिले श्रवणयंत्रे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, अपंग हक्क विकास मंचच्या माध्यमातून 5,500 हजार कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले आहे. आज ही सर्व मुले या श्रवण यंत्राचा वापर करून आपल्या परिस्थितीवर मात करत पुढे जात आहेत. असे शेकडो कामे आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो. एखाद्याला मदत करण्यात काय आनंद असतो हे मदत करणार्‍यालाच कळु शकते. त्यामुळे आपण आपल्या परीने जी होईल ती मदत करून समाजाच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन सुहास तेंडुलकर यांनी केले.

दिव्यांगाना मैत्रीचा हात द्या
दिव्यांगाना समाज प्रवाहात वावरताना संधी उपलब्ध करून देण्याची व मैत्रीचा हात देण्याची गरज आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींनीही आपल्या परिस्थितीचे भांडवल न करता शस्त्र करून प्रगती करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे राज्य प्रमुख सुहास तेंडुलकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिध्दी प्रमुख मनोज पाटणी, जॉन भालेराव, रमेश जाबा, मानसी शिंदे, दुर्गा खरात, संतोष लेणेकर आदींसह विविध माध्यमांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.