औरंगाबाद: जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव या गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल ठाकरे सरकारने व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी न घेतल्याच्या निषेधार्थ येत्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जालना येथे शिवसंग्रामच्या वतीने एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज येथे पत्रपरिषदेत शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, हा मेळावा आक्रमक राहील. याव्दारे मराठा समाजाचा असंतोष एकवटण्यात येईल. तेथे काय करायचे हे आता मी सांगणार नाही. नांदेड येथे अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात, नागपूरला नितीन राऊत व अनील देशमुख यांच्या विरोधात, मुंबईत वर्षा गायकवाड आणि अनील परब यांच्या विरोधात आणि बारामती येथे शरद पवार यांच्या विरोधात एल्गार मेळावे घेण्याची घोषणा विनायक मेटे यांनी यावेळी केली.
मंत्र्यांना भानावर आणण्यासाठी व सत्तेमुळे आलेला त्यांचा माज उतरविण्यासाठी हे एल्गार मेळावे आहेत. मराठ्यांच्या जीवावर हे मोठे होतात, संपत्ती कमावतात, साम्राज्य निर्माण करतात आणि आता हे मंत्री मराठ्यांच्या जीवावर उठले आहेत. आपापल्या खात्यात नोकरभरती सुरू करणारे मंत्री हे मराठा समाजाचे मारेकरी होत, अशी संतप्त प्रतिक्रिया मेटे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, शरद पवार यांनी या प्रश्नात थोडे जरी लक्ष घातले तरी हा प्रश्न मार्गी लागेल. पण ते का लक्ष घालत नाही, हे कळत नाही. सरकारने साष्टपिंपळगावच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, नोकरभरती पुढे ढकलण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षण सुनावणीत हरिश साळवे यांना सहभागी करून घ्यावे अशा मागण्या विनायक मेटे यांनी केल्या.
पाच ऐवजी नऊ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणप्रश्नी सुनावणी व्हायला हवी होती. राज्य सरकारने आम्हाला एकत्रित बसवले नाही. काय करा,काय करू नका हे सांगितले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. किशोर चव्हाण, सलीम पटेल, बाळासाहेब भगनुरे,लक्ष्मण नवले, सचिन मिसाळ, विराज जोगदंड, नागेश दांडाईत,महेश जोगदंड, अरविंद कळकेकर,पंकज उदरभरे आदींची या पत्रपरिषदेस उपस्थिती होती.